सूप,बीप आणि बरेच काही!

knorr soup

माझ्या” द सूप लूप सागा: फूड अलर्ट ” या वॊर्डप्रेस वरील ब्लॉग चे हे मराठी रूपांतर होय.
“तुम्हाला सांगते ,माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचे आरोग्य सगळ्यात आधी! फळे,सलाड सूप असे फक्त हेल्दी च पोटात जाईल असे मी कायम बघते.ते चिवडे तळलेलं अजिबात घरात नसते! “बँकेत उच्चपदस्थ आणि दोन गोड़ मुलींची आई असलेली माझी एक पेशंट खूप अभिमानाने केस घेत असताना मला तिच्या आहार आणि जीवनशैली विषयी सांगत होती.मला कौतुक वाटले.” तुमच्या व्यस्त दिनक्रमात देखील तुम्ही यासाठी वेळ काढता खरंच खूप चांगले आहे हे.”
“डॉकटर हो ना, खरेच आमच्या सारख्या बायकांवर ***** सारख्या ब्रँड चे उपकार च म्हणावे लागेल.अतिशय दर्जेदार आणि केमिकल विरहित रेडी टु मेक सूप मूळे काम इतके सोपे होते ना.मी तर महिनाभराची पाकीट आणून च ठेवते.काम फत्ते.” ती खूप उत्साहाने हे सगळे सांगत होती त्यामुळे माझ्या तोंडातील अहो नाही हे चुकीचे”….. तोंडातच राहिले.
माझ्या त्या पेशंट मैत्रिणीसाठी आणि तिच्या सारख्या बऱ्याच जणींसाठी हा ब्लॉग !
आज आपण राहत असलेल्या काळाला “फिटनेस एरा” हे नाव किती चपखल वाटेल ना.फिटनेस च्या नावाखाली जाहिरात केली जाणारी उत्पादने अगदी तुमच्या आपल्यासारखी शिकली सवरलेली माणसे आणि जागरूक ग्राहक देखील डोळे झाकून घेतात.हि उत्पादने मोठं मोठ्या आणि स्थापित कंपन्यांची असतात त्यामुळे त्या उत्पादनाचा खूप मोठा प्रभाव जनमानसावर लीलया होतो.त्याच त्याच गोष्टींचा भडीमार,आश्वासने आणि अक्षरशः त्या सगळ्या ट्रेंड चा आपण एक भाग होऊन जातो.
ते दाखवतात,ते आग्रह करतात आणि ते तुमच्या कडून ते पदार्थ खरेदी करवून घेतातच ,ग्राहक देखील फिटनेस ,आरोग्य आणि नुट्रीशन अशा भाबड्या शब्दांना भुलून स्वतःकरिता आणि कुटुंबाकरिता असे प्रोसेसज्ड फूड घेतो.

“ओह कम ऑन, आता यात काय प्रॉब्लेम आहे? उत्तम कंपन्यांची दर्जेदार उत्पादने तर आहेत.परत भाज्या आणि व्हिटॅमिन युक्त आहे.वरून हे केमिकल विरहित आहे असे सांगतात कि जाहिरातीत.उगाच का खपतात यांची एवढी उत्पादने? चांगलीच असतील म्हणून च ना?” मला अशा प्रश्नाची सवय आहे. त्यात वाईट काही नाही. असे प्रश्न पडणे साहजिक च आहे.

चला तर बघूया अशा सुपाचे खरे रूप!

soup2

असे सूप बनवतात तरी कसे ?
रेडी मेड सुप पाकिटांचा मूळ उद्देश वेळ न घालवता काही न करता लगेच तयार होणार पदार्थ असा होय.म्हणजे असे पदार्थ हे पाकिटात साठवून ठेवणे अपेक्षित असते .याचाच अर्थ हे पदार्थ टिकवणे देखील अपेक्षित असते.इथे चांगल्या मूळ उद्देशाला बाधा पोचते. पदार्थ टिकवण्या साठी केल्या जाणाऱ्या वेगवगेळ्या प्रक्रिया, त्यात वापरली जाणारी प्रिसर्व्हेटिव्हस,रंग आणि फ्लेवर तसेच इतर रासायनिक पदार्थ त्या मूळ पदार्थांची पोषणमूल्ये कमी करतात.वापरल्या जाणाऱ्या भाज्या ह्या ताज्या वापरूच शकत नाही त्यामुळे त्या खूप गरम वातावरणात अथवा खूप थंड हवेच्या स्रोतात वाळवल्या जातात.सूपला घट्टपणा,स्मूद टेक्सचर येण्याकरता इतर पदार्थ वापरले जातात.हे पाकीट आता तयार होऊन काही दिवस शेल्फ वर राहतात आणि मग तुमच्या आमच्या पोटात विसावतात. नुसते विसावले तर ठीक हो पण ते सूप न विसावता पोटाला आणि एकंदरीत आरोग्याला त्रासदायक ठरते

या सुपांमध्ये काय काय घटक द्रव्ये असतात?
१.वाळवलेल्या भाज्या :ताज्या भाज्या खाणे उत्तम असे आपण शाळेत शिकलो भाज्या ह्या अल्पायुषी असतात त्यामुळे ताज्या खाणे सर्वोत्तम.यात तर चांगल्या ताज्या भाज्या उलट वाळवून वापरल्या जातात.पुढे काही बोलण्याची गरज आहे का ? असे ममी व्हेजी कितीही यमी लागले तरी पोषणात कमी च बरका!
२.बटाट्याचा स्टार्च,कॉर्न चा स्टार्च,किती हि होल व्हीट होल व्हीट केले तरी ते फक्त काही प्रमाणातच वापरता पूर्णतः नव्हे.
३. माल्ट डेक्सट्रिन : ‘नो शुगर एडेड’ या वाक्याला भेद देऊन हे स्वस्तातील साखरेचे सुब्स्टिटूट म्हणून वापरले जाते.हा देखील D -Glucose चाच एक मोलेक्युल होय.सूपला एक मऊसुतपणा आणि घट्टपणा येण्याकरिता हे वापरतात.याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त असतो.
४.मोनोसोडियम ग्लुकमेट आणि बाय सोडियम ग्लुकॅमेत : या रासायनिक पदार्थांमुळे एक अतिशय आवडीची चव जिभेवर निर्माण होते आणि या चवीची सवय देखील लागू शकते आणि वारंवार हि चव हवीहवीशी वाटते.ह्या चवीला उमामी असे नाव आहे.उमामी चव नैसर्गिक रित्या मिळवणे अतिशय कसबीचे आणि खर्चिक आणि किचकट असते. तसेच खूप कमी नैसर्गिक पदार्थांमध्ये ती चव मिळते. हे पदार्थ बहुतांश मांसाचेच प्रकार असतात.कृत्रिम ग्लुटामेट हे मेंदूतील GABA ह्या रसायनाशी निगडित असतात. हे रसायन आणि त्याचे प्रमाण मेंदूतील खूप किचकट कारभारांशी निगडित असते.कृत्रिम ग्लुटामेट च्या अल्प सेवनाने देखील मेंदूतील रसायनाचे स्रवण्याचे प्रमाण कमी जास्त होते.ग्लुटामेट च्या नियमित सेवनाने मायग्रेन,फायब्रोमायाल्जिआ,वर्तन संबंधीचे विकार,ऍलर्जी,अस्थमा,हृदयाचे अनियमित ठोके संबंधित विकार,डिप्रेशन,रेस्टलेस लेग सिंड्रोम,सतत जुलाब होणे, इतर पचनाच्या तक्रारी उद्भवतात.मोनोसोडियम ग्लुटामेट हे एक एक्सिटोसीन (exitosin : द टेस्ट दॅट किल्स) म्हणजे अति उत्तेजना निर्माण करणारे द्रव्य आहे ज्यामुळे पेशींचे विभाजन लवकर होऊ शकते.
याखेरीज अवास्तव वजन वाढणे, स्त्रियांमधील वंध्यत्व आणि डायबेटीस हे विकार होतात हे संशोधनाने प्रमाणित होय.बरेचदा उत्पदक पाकिटावर MSG किंवा DSG असे न छापता हायड्रोलिज्ड यीस्ट ,हायड्रोलिज्ड वेजिटेबल्स,सोया प्रोटीन,न्याचरल एक्सट्रॅक्टस,यीस्ट एक्सट्रॅक्ट,प्रोटीन आयसोलेट असे लिहलेले असते. याचा अर्थ कृत्रिम ग्लुटामेट आहे असाच आहे
BPA :नावाचे एक रसायन बरेचदा रेडिमेड पदार्थाच्या धातूच्या टिन मध्ये आतून लावलेले असते.खरे तर याचा उपयोग कॅश रेसिट्स,प्लास्टिक यामध्ये भरपूर आढळतो.असे BPA चुकून त्या पदार्थात मिसळले जाऊन स्त्रियांमधील स्तनांचा कॅन्सर,हॉर्मोन ची अनियमितता,आणि किशोरवयीन मुलींमध्ये वर्तनसंबंधी समस्या आढळून येतात

कृत्रिम चवी,रंग ,वास,आणि टिकवण्यासाठी वापरलेली रसायने आरोग्यासाठी घटक असतात हे तर सर्वश्रुत आहेच.त्याबद्दल विवेचन करायची गरज नसावी.

असे असेल तर आमच्यासारख्या अतिशय व्यस्त लोकांना उत्तम पर्याय काय ?
कुणी सांगितले कि पोषण मिळवण्याचा पर्याय हे सुपाचे प्रकार असतात असे?जर वेळ काढून असे ताजे सूप बनवता येत नसेल तर त्यातून इतर उत्तम पर्याय आणि काही उपाय बघू.
शक्यतो असे रेडिमेड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ किराण्याच्या यादीत आणि घरात किचन मध्ये नसावेत.आपल्या घरात वर्षानुवर्षे केले जाणारे खाल्ले जाणारे पदार्थ हाच उत्तम पर्याय ठरतो.
परंतु मला सूप च हवे असा हट्ट असेल तर खालील बाबी तुम्हाला मदत करतील.
असे रसायनयुक्त सूप पिण्याऐवजी भाज्या उकडवून नीट बंद डब्यात सकाळीच भरून ठेवा.संध्याकाळी प्यायच्या वेळी अर्ध्या मिनिटात मिक्सर मधून ब्लेंड करा आणि सुंठ,मिरे लवंग,सैंधव पावडर टाकून फक्त २ मिनिटे उकळावं.बाऊलमध्ये मऊ मऊ गरम सूप वाढून त्यावर लिंबाचे ३ ४ थेम्ब पिळावे आणि मस्त गायीच्या तुपाचा एक चमचा sesaoning म्हणून घालावा. ४ मिनिटात चविष्ट सूप पोटात असेल.
नाचणीचे पीठ भाजून डब्यात भरून ठेवावे.२ महिने उत्तम टिकते.जेंव्हा सूप प्यायची इच्छा होईल तेंव्हा त्या पिठात पाणी मिसळून पातळ करून एक उकळी आणावी ठेचलेला लसूण,ओवा ,मीठ,आणि वाढताना ताक मिसळावे. वरून मस्त थोडी खोबऱ्याची चटणी भुरभुरा.आणि गरम गरम स्मूथ पातळ आंबील सारखे सूप तयार.असेच ज्वारी बाजरी,राजगिरा पिठाचे हि करता येईल.
वेगवगेळ्या डाळी नीट शिजवून एकजीव करून डब्यात फ्रिज मध्ये ठेवा.सूप हवे असेल तेंव्हा ह्याच डाळींचे पातळ कढण करा तुपाची फोडणी द्या.उत्तम प्रथिने पोटात जातील.
ह्या खेरीज आमसूल सार ,टोमॅटो सर,लाल भोपळ्याचे सार,सिंधी कढी असे एकापेक्षा एक पदार्थ नीट नियोजन केल्यास कमी वेळेत होऊ शकतात.
प्रोसेसज्ड फूड च्या विळख्यात कृपया तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला देखील अडकू देऊ नका.
वरील सर्व वर्णन रेडिमेड सूप खेरीज वेगवेगळे सॉस,टिकवले खारवलेले पॅकेट मधले मास,मासे ,फिश सॉस, या सगळ्यांना देखील लागू होय.जे विकत घेता त्यातील घटक द्रव्य नीट वाचा पडताळा आणि मगच ते पदार्थ पोटात ढकला.

 

Advertisements

Celebrate sweets !

दिवाळीचे दिवस आहे पाहुणे ,भेटीगाठी आणि गोड़ पदार्थ हि देखील आगळीवेगळी पर्वणीच! याच धर्तीवर
एका पेशंटच्या सहज विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आज ब्लॉग म्हणून पोस्ट करतेय.

“डॉक्टर ,बाहेरील गोड व्यंजने विशेषतः खव्याची व्यंजने टाळावी असे तुम्ही कायम सुचवता. काही सहज सोप्या पारंपरिक गोड व्यंजनांची यादी देऊ शकाल का? थोडे आधी प्लॅन करून वेळ असेल तेंव्हा करता येतील असे काही पारंपरिक वेगळ्या पदार्थांची यादी द्याल का ? दिवाळीत मेजवान्या होतच असतात नक्की करून बघीन”

उत्तर: बाहेरील भेसळीचा खवा,कृत्रिम रंग,रसायने चव आणि सुगंध यामुळे शक्यतो बाहेरची व्यंजने टाळावीत. अगदी खात्रीशीर ठिकाणाहून च आणणे चांगले.इतर वेळी शक्यतो खालील वेगळी आणि साधी व्यंजने घरी करणे उत्तम.त्यातल्या त्यात सोपी,माहित असलेली परंतु कमी केल्या जाणारी पारंपरिक व्यंजने आवर्जून देतेय. ह्या व्यंजनामध्ये पौष्टिकता अर्थातच जमेची बाजू आहेच.
मिठाई गुलाबजाम आणि इतर व्यंजनांपेक्षा काहीतरी वेगळे .


१.कुस्करून एकजीव केलेल्या काळ्या खजुराची सुका मेवा घातलेली वडी (घरी उत्तम बनवता येते)
२.मनुका सुकामेवा खजूर अंजीर ओले नारळ  टाकून लोहयुक्त आणि चविष्ट पाकातील भात(नारळी भात)
३.पंचखाद्य (खोबरे,सुकामेवा,खारीक,मनुका वेलची जायफळ केशर ) घालून सुवासिक तांदूळ भिजवून,बारीक वाटून दुधात शिजवलेली तांदुळाची खीर किंवा फिरनी.
४.रवाळ दळलेल्या गव्हाच्या कणकेचा साजूक तुपातील गूळ घालून शिरा.
५.परतताना भरपूर साय टाकून ओल्या खोबऱ्याची वडी( यात रंगाकरता बिटरसाचे ४ थेम्ब , गुलाबपाकळ्या,केशर,गवती चहाच्या पानाचा २ थेम्ब रस असे वैविध्य ठेवू शकतो)
६.रवा गुळाच्या खमंग साठोऱ्या किंवा सांजोऱ्या तुपाबरोबर.
७.ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याची करंजी
८.गव्हाच्या दलियाची गूळ,जायफळ वेलची बडीशेप घालून खमंग खीर किंवा लापशी.वरून फेटलेले क्रिम आणि सुका मेवा घालून मातीच्या भांड्यात सेट करून सर्व्ह केली तर अपिलिंग होणारच
९.मुगाचे पीठ खमंग भाजून ठेवावे. हवे तेंव्हा पटकन भरपूर तुपात थोडे भाजून गरम पाणी ओतून शिजवून साखर टाकली कि चविष्ट मूग हलवा तयार.
१०.ओल्या नारळाची खीर घट्ट साय अथवा दूध घालून थंड वाढावी उत्तम पित्तनाशक आणि चविष्ट डेझर्ट देखील होय.
११.कणिक,तांदूळ पीठ दुधात भिजवून त्यापासून पाकातील मालपुवा (हा सुद्धा पटकन होऊ शकतो बरका)
१२.लाल भोपळा आणि गुळाच्या गोड पुऱ्या अथवा घारगे.
१३.उकडीचे गुळाच्या सारणाचे मोदक(वेळ असेल तेंव्हा कराच.हे डेसर्ट नक्कीच भाव खाऊन जाते)
१४.गुळाच्या पाण्यात भिजवून केलेले कणकेचे उकडलेले दिवे छान फेटलेले क्रीम अथवा सुक्या मेव्याचे सारण भरून सर्व्ह केले तर निश्चित वेगळे पण असणारे व्यंजन ठरेल.
१५.पंचखाद्य(खोबरे,सुकामेवा,खारीक,मनुका वेलची जायफळ केशर )घट्ट दुधातील शेवयाची खीर
१६.गुळाच्या पुरणाचे काठोकाठ भरलेले कणकेचे दिंड तव्यावर तुपावर भाजून अतिशय उत्तम लागतात आणि वेगळे व्यंजन हवे ते आकर्षक नाव देऊन वाढा
हमखास आवडतील.
१७.मिश्र डाळीचे पीठ तुपावर भाजून त्यापासून गोड़ पाकातल्या अथवा साध्या वड्या खोबरं किसात घोळवून सर्व्ह करा
१८. पांढरा शुभ्र पाकातील मजबूत वेलची जायफळ घातलेला नारळी रवा लाडू तर मला विशेष प्रिय .
मला वाटते भरपूर पर्याय झालेत. अर्थातच थोडे आधी प्लॅन केले तर ह्या पदार्थाना तशी खूप पूर्वतयारी लागत नसल्याने ते निश्चित करायला जमतील. वाचक आणि पेशंट स्वतःहून आहारशैलीत सकारात्मक बदल करावयास उत्सुक दिसले कि अर्थातच लिखाणाचे सार्थक झाल्याचा आनंद मिळतोच.
वरील सर्व व्यंजने हि बाहेरील विकतच्या मिठाईला पर्याय म्हणून होत, जी बरेचदा भेसळी मुळे अपायकारक ठरत असते. अर्थातच यातील पदार्थ तब्येतीचा अंदाज घेऊन कमी वेळा आणि व्यंजनांच्या मात्रेत च खाणे कधीही हितावह.
(स्वतःच्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन यंदा दिवाळीत मोजकेच आणि स्वाथ्याला उपकारक तेवढेच आणि तेच खा. या संबंधी अधिक माहिती आपण माझ्या उदरस्थ या आहारविषयक पुस्तकात वाचू शकाल.)

Diet etiquette

“आहाराची बाराखडी”

“आहारात् सर्वभूतानि संभवन्ति महीपते/ आहारेन् विवर्धन्ते तेन जीवन्ति जन्तवः//” (महाभारत)
आहार हा प्रत्यक्ष प्राणाचे धारण करणारा घटक आहे.आहारापासूनच मनुष्याची आणि इतर जीवांची उत्पत्ती होते,आहारामुळेच त्या जीवांची वाढ आणि पोषण होते तर आहारामुळेच(चुकीच्या) त्यांचा नाश होतो.

वेद,काव्य आणि पुराण लिखाणातून आहाराबाबाबत खूप मार्मिक दाखले वाचायला मिळतात.
आहाराबाबत काही साधे सोपे नियम मार्गदर्शन आहेत का? वैद्य लोक खोलात आहाराबद्दल ,पथ्याबद्दल सांगत असतातच. परंतु आहाराची बाराखडी काय असे एक पेशंट ने सहज विचारले. सर्वानाच त्यातून काहीतरी फायदा मिळेल म्हणून हि पोस्ट !
Image result for food dos donts

 1. सर्वदा मिताहारी असावे.मिताहार पाचक अग्नी प्रदीप्त करतो. (मिताहार याचा अर्थ पोटाला पुरेसा हलका आहार होय)
 2. आहार हा सहा रसांनी (गोड़,तिखट,कडू,खारट,आंबट,तुरट)युक्त असावा . फक्त गोड़ , फक्त तिखट असे एक रस प्रधान अन्न खाल्याने शरीराचे पोषण होत नाही.आहारात वैविध्य असावे ते याचकरता.
 3. अन्न जड असेल (उदा.मिष्टान्न,मांसाहार,इत्यादी)तर पोट अर्धे भरेस्तोवरच खावे.पचायला हलके अन्न देखील पोटात किंचित जागा ठेवून पोट भरेल एवढेच खावे .
 4. सहजपणे पचवता येईल इतका आहार म्हणजे आहाराची योग्य मात्रा आहे.पोटाचे चार भाग करून चवथा भाग रिकामा राहील एवढे अन्नसेवन हे आहारसेवनाचे योग्य प्रमाण होय.
 5. शरीराला हवे त्यापेक्षा कमी(उदा. अति उपास करणे, डाएट करणे इत्यादी)आहार घेतल्यास शरीराला बळ,तेज पुष्टी मिळत नाही तसेच वात दोष निर्माण होऊन वातव्याधी होऊ शकतात
 6. अति आहार सेवन केल्यास तर लगेच तिन्ही दोषांचा विशेषतः कफ दोषाचा प्रकोप होऊन अजीर्ण आणि पचनाचे विविध व्याधी उत्पन्न होतात.
 7. केवळ अति अन्न झाल्यानेच अजीर्ण इत्यादी आजार होतात असे नव्हे. न आवडणारे अन्न बळजबरी खाल्याने,करपलेले,वातूळ,खूप कोरडे,खूप थंड,शिळे, नासलेले अन्न देखील विविध विकार उत्पन्न करते.
  पूर्वी खाल्लेले अन्न पूर्ण पंचायच्या आत परत आहार घेऊ नये.
 8. पचायला जड ,गोड़ तसेच घट्ट किंवा कोरडे पदार्थ जेवण्याच्या सुरुवातीला खावे आणि त्यानंतर पचायला हलके, आंबट,मीठ घातलेले तसेच पातळ पदार्थ खावे. असा विशेष उल्लेख पचनाच्या दृष्टीने आयुर्वेदात आढळतो. प्रत्यक्षात मात्र आपण गोड़ पदार्थ भरपूर प्रमाणात आहाराच्या शेवटी खातो. त्यामुळे अन्न नीट न पचणे आणि तत्सम त्रास होतात.
 9. भोजनानंतर घटाघट पाणी पिऊ नये. भोजनामध्ये थोडे घोट घोट प्यावे .पोटात अंदाजाने २ भाग अन्नासाठी एक भाग पाण्यासाठी आणि एक भाग रिकामा ठेवणे अपेक्षित असते. पचनाच्या क्रियेत निर्माण होणाऱ्या वातासाठी हि जागा ठेवली नाही तर अन्न पचताना आमाशयावर या वातामुळे ताण येतो.यामुळे उचकी लागणे किंवा छातीत,पोटात दुखणे असे त्रास होतात
 10. भोजनानंतर लगेच शारीरिक कष्ट जसे जोरात चालणे ,पळणे ,तसेच झोपणे ,खूप बोलणे, उष्णेतच्या जवळ जाणे अथवा उन्हात जाणे,स्नान करणे या गोष्टी वर्ज्य आहेत.निदान ४५ मिनिटे ते १ तास या गोष्टी अवश्य टाळाव्या याने पचन क्रियेत बाधा येत नाही. या कालावधीत शरीरातील अग्नी किंवा सोप्या भाषेत रक्तपुरवठा हा पचनसंस्थेकडे असणे आवश्यक असतो.परंतु शारीरिक कष्टाच्या क्रिया केल्यास तोच अर्थातच हात पाय आणि हृदयाकडे वाढतो. त्यामुळे हृदयावर तर ताण येतोच शिवाय पचन क्रियेत हि बाधा येते. असे वारंवार झाले तर अनेक पचनाच्या व इतरही व्याधी जडतात.
  जेवणानंतर लगेच झोपल्याने कफदोष वाढतो आणि हृदयाचा रक्ताभिसरण वेग कमी झाल्यामुळे ,अन्न पचन क्रिया मंदावते.
 11. जेवताना चिंता,शोक,क्रोध,भीती,किळस आदी भाव मनात नसावे असा विशेष उल्लेख आयुर्वेदात आहे. मानसिक भावभावनांचा पचनावर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत असतो हे आता सर्वज्ञात आहे. अगदी हेच या विधानातून अभिप्रेत आहे.
 12. विरुद्धान्न ,असात्म्य (सवय नसलेले),प्रकृतीच्या विरुद्ध ,ऋतूला अनुकूल नसलेले अन्नसेवन टाळावे.

(यातील प्रत्येक बाबीवर एक लेख होईल. लिहिण्याचा निश्चित प्रयत्न असेल.)

“Golden wheat in black list?”

Résultat d’images pour images wheat

 “आरोपीच्या पिंजरा आणि गहू
गेले काही दिवस सकाळी सकाळी whats app पाहिले कि वाचकांचे खूप एकसारख्याच आशयांचे messages मला येताय .
एक गव्हाबद्दलची भली मोठी पोस्ट आणि लगेच ख़ाली प्रश्न ,”म्हणजे आम्ही पोळ्या खाणे सोडावे की काय?” “गहू  खाणे बंद करू का आम्ही ?” “डॉ क्रुपया या पोस्ट बद्दल काहीतरी लिहा ” असे अनेक प्रश्न आणि यासम्बन्धी आयुर्वेद संदर्भ आणि माझे मत सतत वाचक मागताय म्हणून ही पोस्ट ! (माझी पोळ्यावाली काकू voluntary retirement घेऊ नये हा देखील स्वार्थ )
या पोस्ट मध्ये मी खूप सखोल गव्हाचा इतिहास त्यावरचे किचकट संशोधन आणि त्याचे संदर्भ देणे टाळतेय कारण आम्ही पोळ्या खाऊ की नाही असा साधा प्रश्न वाचक वर्गाला पडलाय.
गेल्या काही वर्षात gluten allergy आणि gluten free food चा फारच गवगवा होतोय.अर्थात् तो पाश्चिमात्य देशातून भारतात पोचला.
allergy ही गव्हातील gluten खेरीज खूप पदार्थांची असू शकते काही उदाहरणे द्यायची झाल्यास अंडी ,शेंगदाणे ,दूध आणि दुधाची व्यंजने इत्यादि. म्हणुन सगळ्यांनी  खाण्यातुन  या गोष्टी सरसकट बाद केल्या का ?
या पदार्थांचे मार्केट खुप मोठे आहे.अगदी असाच सीन तुप आणि तेलाच्या संशोधनाने काही वर्षापूर्वी लोकांसमोर मांडला होता .अनेक वर्षे तेलातूपाला आपण वाळीत टाकले होते.आज संशोधक पूर्वीचे संशोधन खोडून काढ्ताय आणि तेल तुपाची औषधी बाजू जगासमोर आणली जातेय.
गव्हाच्या बाबतीत कमीत कमी शब्दात आणि सरळ भाषेत काही मुद्दे .
गहू गुणांनी थंड ,शरीराचे उत्तम पोषण करणारे ,पचायला जड आणि हाडांना जोडणारे अथवा सांधणारे असे वर्णन आयुर्वेदिक ग्रंथात आहे
1.गहू गुरु गुणांचे म्हणजेच पचायला जड़ असतात.गुरु गुणांच्या अन्न द्रव्याना आयुर्वेदात एक नियम असतो.असे पदार्थ हे खूप प्रमाणात खूप वेळा आणि पचन्शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी जपून खावे .खाताना ऋतू ,देश आपली प्रक्रुती याचे ही तारतम्य ठेवावे .
आम्ही वैद्य लोक सारखे ज्वारी बाजरी भाकरी  वर भर देतो याचे हेही एक कारण होय.
2.allergy हे सुक्ष्म स्तरावरील अपचनाचेच स्वरूप होय.तुम्ही नीट पचवू न  शकलेले घटक आमस्वरुपात वेगवेगळे रोग निर्माण करणारच, मग ते गव्हाचे अजीर्ण असो अथवा एखादया फळाचे नाहीतर माँसाहाराचे नाहीतर एखाद्या औषधाचे.
पचनानंतर बनलेला घटक शरीराला सात्म्य नसेल तर तो  शरीरात शोषल्या जात नाही ,उलट शरिराकडुन त्याला प्रतिरोध म्हणुन allergy ची लक्षणे दिसतात.
3.गहू गुणांनी चिकट असतो म्हणुनच कणीक तिम्बताना त्यात स्नेह म्हणजेच तेल घातले जाते जेणेकरून त्याचा चिकट्पना पचनाच्या आड येऊ नये.
एक गोष्ट ध्यानात असू द्या गव्हाचा आम्बवून तयार केलेला ब्रेड आणि गव्हाची ताजी नीट भाजलेली गरम साजुक तुप घातलेली पोळी यात गुणांनी निश्चित फरक असणार.
4.गव्हाने कोलेस्टरॉल वाढते असे जे म्हट्लेय हा मुद्दा परत गव्हाचे अपचन असाच आहे.सरसकट सगळ्याना ते होण्याचे कारणच नाही.याही ऊपर आता पाश्चिमात्य संशोधकांचे च म्हणणे आहे की कोलेस्टरॉल आणि ह्रूद्रोग सम्बन्ध अनिश्चित आहे म्हणुन.त्यामूळे गहू खाल्याने ह्रूद्रोग होतो म्हणणे खूप जास्त धाडसाचे आहे .
5.आज अन्नधान्य त्या त्या प्रदेशापुरते मर्यादित न  राहता सर्वत्र उपलब्ध असते आणि खाल्ले जाते.हट्टाकट्टा पंजाब चे मुख्य धान्य गहू ही त्याला अपवाद नाही.
शेतीकरनात झालेली आमूलाग्र क्रांती उत्पादन वाढविण्यास उपकारक ठरली मात्र मूळ धान्याचे गुणधर्म त्यात कायम राहिले की नाही या शंकेला वाव आहे.
आपण काय करावे ?अन्नधान्य संकरित आहे फळे क्रूत्रिम रित्या पिकवलि जातायत,मांस सम्प्रेरक युक्त असते.
गव्हाचे सांगायचे झाले तर सम्पूर्ण गहू बंद करणे हा उपाय नव्हे.
आपल्या मूळच्या चालीरीती आणि खाद्यसंस्कृती यात खरे उत्तर होय.
एकच एक गहू असे न  करता ज्वारी ,बाजरी ,नाचणीपासून  केलेल्या भाकरी खाण्यात असाव्या.
मागे मी नाश्त्याची पोस्ट जेंव्हा लिहलि तेंव्हा वैविध्य आणि समतोल असे दोन मुद्दे ग्रुहीत धरूनच वेगवेगळे 30 पदार्थ सांगितले होते.
भात वर्ज्य करा सांगणारे परत भात खा आणि पोळ्या सोडा  म्हणताय.विविध स्थानिक फळे भाज्या धान्य व्यंजने याचा आहारात समतोल असावा.स्वतची पचन शक्ति ध्यानात घ्यावी.कुठल्याच एक पदार्थाचा अतिरेक करू नये.
गव्हा बाबतची ती पोस्ट म्हणजे कुठल्यातरी ओट सारख्या पदार्थांची बाजारात आणण्यापुर्विची marketing strategy देखील असू शकते.एकदा गव्हाला वाईट ठरवले की येणाऱ्या पदार्थांची विक्री पक्की.
तेंव्हा panic होऊ नका.समतोल आहाराविषयक सल्ला जरूर घ्या.

“व्यायाम आणि तुमची पत्रिका ,गुण जुळताय ना?”

“व्यायाम आणि तुमची पत्रिका , गुण जुळताय ना?”
Image result for different people exercise images
वर्डप्रेसवरील माझ्या “मॅच द होरोस्कोप:माय फिट ,माय साईझ,माय एक्सरसाईझ ” या लेखाचा मराठी अनुवाद वाचकांच्या सांगण्यावरून.
पृथीवरील प्रत्येक सजीव मनुष्य हा एकमेव,अद्वितीय स्वतासारखा स्वतःच असा नमुना असतो.बोटांचे ठसे, स्वतंत्र आणि unique असा आवाज,डोळ्यांच्या बुबुळांची संरचना,मेंदूवरील वळ्या, जेनेटिक संरचना आणि मनाचा कारभार हे सगळे ओरडून ओरडून सिद्ध करतात कि माझ्या सारखा मीच बरका ! कॉपी पेस्ट होणे नाही!
एकच वहाण जोडी सगळ्या पायांना फिट होणे नाही! माझा पाय माझी वहाण!
अगदी याच तत्वावर आयुर्वेद प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आणि एकमेव म्हणून लक्षात घेत असतो.व्यक्ती वेगळी, विचार वेगळा आणि त्यानुसार चिकित्सा हि वेगवेगळी.
जे वाचक माझे लेख नियमितपणे वाचतात ,त्यांना आता वात दोष ,कफ दोष आणि पित्त दोष या संज्ञा काही नवीन नाही.या दोषांच्या संयोगातून कमी अधिक असण्यातून प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र अशी प्रकृती तयार झालेली असते. वात, पित्त कफ अशी प्रमुख तर वात- पित्त,कफ -पित्त,कफ- वात अशी कॉम्बिनेशन देखील प्रकृतीत असतात.आणि या दोषांच्या बाहुल्याने त्या व्यक्तीची वर उल्लेखिलेली आवाज, बुबुळे,मानसिकता आणि इतरही शारीरिक रचना घडते.
मनुष्याची शारीरिक आणि मानसिक प्रकृती हि कन्सेप्ट म्हणजे आयुर्वेदाने औषधी आणि आरोग्यशास्त्राला दिलेली सगळ्यात मोठी भेट होय. अगदी १० नोबेल कमी पडावे इतकी श्रेष्ठ !असो.
विश्वास बसणार नाही परंतु या प्रकृतीचा मनुष्याच्या छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टींवर प्रभाव असतो.शरीराचा बांधा, रंग,केस,नख,उंची, रोगप्रतिकारकता,खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी,स्वभाव,चंचलता,स्थैर्य,राग झोप,भूक,छंद,प्रजनन क्षमता,लैंगिक जीवन,व्यायाम ,बौद्धिक कल अथवा सरासरी बुध्यांक,होणारे आजार,त्यांचे उपचार हे सर्व प्रकृती आणि त्यातील सहभागी दोष यावर अवलंबून असते. ऋतू,भौगोलिकता आणि इतर बाह्य कारणाचा देखील प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम होतो याला कारण देखील प्रकृतीचं होय!
या लेखात व्यायाम आणि प्रकृती बघुयात!
व्यायामासाठी काही लोक कायम आनंदाने तयार तर काहींचा कल व्यायाम टाळण्यामागे का असतो ? एकाच प्रकारचे व्यायाम १० जण करत असतील तर त्या दहा व्यक्तींमध्ये सारखेच परिणाम का नाही दिसत?व्यायामाने काही लोकांना दिवसभर हलके वाटते तर काही लोकांना प्रचंड अंगदुखी असे का होते?
एकाच कारणामुळे कर्ती करवती एकमेव प्रकृती ! तुमची प्रकृती हीच तुमची खरी पत्रिका किंवा कुंडली!
वात दोष प्रधान प्रकृती:
सातत्य नसणे आणि सतत बदल या दोन गोष्टी वात प्रकृतीच्या लोकांमध्ये निश्चित असतात.
चयापचय क्रियेची अधिक असलेली गती आणि कमी सहनशीलता अथवा एन्ड्युरन्स हेही व्यायामासाठी थोड्या प्रतिकूल गोष्टी असतात.ह्या गोष्टींमुळे ह्या व्यक्तींना पारंपरिक पद्धतीने व्यायामशाळेत जाऊन खूप व्यायाम करणे बरेचदा झेपत नाही असेच दिसते.ह्या व्यक्तींचे वजन पटकन कमी होते.परंतु वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये वजन आणि muscle मास वाढविणे हि मोठी अवघड गोष्ट असते. बरेचदा muscle वर्क आऊट आणि प्रोटीन पावडर चा भडीमार देखील काही फरक दाखवत नाही तेंव्हा आपली प्रकृती तर यास कारणीभूत नाही ना याचा नक्की विचार करा.व्यायामानंतर प्रचंड अंगदुखी होणे,संधीशूल होणे हे वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये दिसते.
आधुनिक व्यायामशास्त्रात यालाच ectomorph body type असे म्हणतात.
वात प्रकृतीच्या लोकांना खालील व्यायाम सहज साध्य होऊ शकतो.
1.तुलनात्मक सोपे आणि सतत नावीन्य असलेले व्यायामप्रकार याना खूप साजेसे असतात.
2.आधीच वात दोष आधिक्य असल्याने कमी कार्डिओ व्यायाम सुद्धा याना पुरेसे होतात.अतिप्रमाणात कार्डिओ व्यायाम वात वाढवून दुष्परिणाम पण करू शकतो.
3.योग साधना आणि ध्यानधारणा तर या लोकांकरता अगदी योग्य आणि आवश्यक च असलेला व्यायामप्रकार होय.वात प्रकृती व्यक्तींनी नक्कीच करावा.त्याने चंचलता आणि इतर वाताचे मानस प्रकृतीवर योग्य परिणाम साधता येतात.
4.याखेरीज चालणे, बॅडमिंटन,पोहणे हे व्यायामप्रकार हि योग्य होत.
गती आणि चपळता यामुळे बरेच मॅरेथॉन रनर मध्ये वाताचे गुण असू शकते .
पित्त प्रकृती :
पित्त प्रकृतीचे लोक उष्ण गुणाच्या अधिक्याखाली असतात. जिम मध्ये एकेरी पित्त प्रकृतीच्या लोकांना सलग व्यायाम बरेचदा सोसत नाही असे प्रत्यक्षात दिसते.
उष्णतेतील व्यायामप्रकार आणि आऊटडोअर ऍक्टिव्हिटी देखील पित्त प्रकृतीच्या लोकांना खूप काळ सहन होत नाही. चयापचयाची क्रिया(metabolic rate ) ह्या लोकांमध्ये देखील तुलनेत अधिक असते.अधिक वजन वाढतच नाही परंतु अवास्तव वाढलेले वजन पटकन कमी होण्याची प्रवृत्ती पित्त प्रकृतीची खासियत असते. आधुनिक शास्त्रात mesomorph म्हणून ओळखली जाणारी शरीराची ठेवणं पित्त प्रकृतीशी साधर्म्य दाखवते.
पित्त प्रकृतीकरिता खालील व्यायामप्रकार उत्तम होत.
1.माध्यम प्रमाणात कार्डिओ आणि वेट ट्रैनिंग.
2.सकाळी लवकर चालणे अथवा सायकलिंग
3.पोहणे हा व्यायाम पित्त प्रकृतीकरिता खूप फायदेशीर असतो.
4.सोप्या ट्रेकस,बॅडमिंटन, इतर मैदानी खेळ काही प्रमाणात फायदेशीर असतात.
5.मुळातील तापट स्वभाव आणि तीव्र रिस्पॉन्स या पित्त प्रधान गुणधर्मावर योग आणि ध्यानधारणा खूप उपयोगी ठरते.
कफ प्रकृती:
स्थैर्य, सातत्य आणि सहनशीलता ह्या जमेच्या बाजूंचे कफ प्रकृतीच्या लोकांना वरदान असते. त्यामुळे व्यायामात सातत्य असते. ह्या व्यक्तीचे वजन लवकर वाढण्याकडे कल असतो आणि वजन कमी करण्याकरिता वेळ हि लागतो.
उष्णता याना उपकारक असल्याने भरपूर घाम येणे हितावह असते. हि लोकं कष्टाचे व्यायाम सोसू शकतात.या लोकांच्या कफ प्रकृतीच्या गुणांचा उत्तम उपयोग जर व्यायामात करवून घेतला तर अतिशय आदर्श परिणाम मिळतात.
कफ प्रकृतीकरिता खालील व्यायामप्रकार उत्तम :
1.मैदानी खेळ जसे क्रिकेट, फुटबॉल.
2.बॅडमिंटन,पोहणे देखी उत्तम परिणाम दाखवतात.
3.नियमित कार्डिओ आणि वेट ट्रैनिंग.
4.सायकलिंग आणि अवघड ट्रेक्स देखील बरेचदा हे लोक नेटाने पूर्ण करतात.
प्रकृती खेरीज शरीराच्या ,आहार विहाराच्या आणि ऋतूंच्याही बदलांचा व्यायामाशी संबंध असतो. तो कधीतरी पुढील लेखात बघूच. तूर्त या लेखाचा take home message असा कि एकाच पठडीतील व्यायाम तुम्ही १० लोकांना करायला लावणे म्हणजे ससा,मासा आणि चिमणी ची पळायची शर्यत लावण्यासारखे होईल.
आपली पत्रिका आणि व्यायाम यांचे गुण जुळवा .
आणि मग शुभ मंगल…..व्यायामाचे! मूळ इंग्रजी लेख वर्डप्रेस वर नक्की वाचा.
वैद्य रुपाली पानसे
आद्यं आयुर्वेद ,पुणे
९६२३४४८७९८
rupali.panse@gmail.com
वरील लेख दिनांक १४ मे २०१७, लेखिका वैद्य रुपाली पानसे यांचा होय.लेखाच्या लिखाणात बदल करणे ,लेखिकेचे नाव बदलणे अथवा लेखाशी इतर छेडछाड हा कायदेशीर गुन्हा म्हणून ग्राह्य होय.
लेख आवडल्यास लेखिकेचे नाव आणि इतर माहितीसह जसाच्या तसा पुढे पाठवा. आपल्या या कृतीने लिखाणासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कार्यी लागल्याचे समाधान मिळेल
लेखिकेचे इतर लिखाण आपण पुढील लिंक वर वाचू शकाल .. drrupalipanse.wordpress.com

Soda:Tobacco of 21century.

फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्यसन !

माझ्या वर्डप्रेसवरील ‘बबली,फ्रिझी,स्वीट ऍडिक्शन’ ह्या लेखाचा हा मराठी अनुवाद होय.

“पालक त्यांच्या मुलांना त्यांच्याच लाडाने मारताय का?पालक आपल्या मुलांना व्यसनी बनवताय का?खूप प्रेम आहे म्हणून किंवा नाही म्हणूं शकत नाही म्हणून आपणच आपल्या मुलांना गोड विष देताय का?

मागे कुठेतरी एक वाक्य वाचले होते,’सोडा(शीतपेय) हे २१ व्या शतकाची तंबाखू!’ मनोमन पटले एकदम.
परंतु वाटले कि सोडा, सॉफ्ट ड्रिंक , पेप्सी कोक वाईट असते हे आज सगळ्यांना माहित आहे त्यावर वेगळे खास मोठे आर्टिकल लिहायची विशेष गरज नाही. परंतु एक प्रसंग असा घडला कि मी लिहायला घेतले याच विषयावर .

पुण्यात सेनापती बापट रोड वरील एका सिग्नल वर आलिशान कार मध्ये जेमतेम ३ साडेतीन वर्षाची मुलगी कोक च्या कॅन मधून कोक पीतपीत मला वाकुल्या दाखवून चिडवत होती.मोठी गोड दिसत होती ती तसे करताना. मी तिला तिच्या कॅन कडे बोट करून ‘ब्या sss ‘ करून अंगठा खाली करून चिडवत होते. माझ्या त्या कृतीचा अर्थ चिमुकलीला कळला नसला तरी तिच्या ओशाळून हसत असलेल्या आईच्या ध्यानात आला असेल अशी आशा! सिग्नल सुटला आणि आमचा चिडवाचिडवीचा खेळ हि संपला.
चिमुकलीचा चेहरा काही केल्या डोळ्यासमोरून जाईना. का? त्या मुलीच्या चिमुरडीच्या हातात कोक का? खरेतर कुठल्याही मुली अथवा मुलाच्या हातात शीतपेय,सोडा,सॉफ्ट ड्रिंक, कोक पेप्सी का?

तुमची मुले हातात जेंव्हा ती सॉफ्ट ड्रिंक बाटली धरतात तेंव्हा नेमके ते काय धरतात तुम्हाला कल्पना आहे का?

सॉफ्ट ड्रिंक मधील घटक घटकद्रव्ये:
1.कॅफिन, साखर, हाय फ्रुक्टोस कॉर्न सिरप, फॉस्फोरिक आणि इतर ऍसिडस् ,कृत्रिम घटक चव आणि रंग, वादातीत पेस्टीसाईड(जंतुनाशके),हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायू हे अतिशय हानिकारक आणि आरोग्यास अजिबात उपकारक नसलेले घटक होत.

2.ज्याच्या सततच्या वापराने कॅन्सर होऊ शकतो असा 4MEI हे रसायन बॅन केले असले तरी पेप्सी सारख्या काही शीतपेयांमध्ये आढळतेच.

3.काही स्रोतांच्या आधारे गर्भपात झालेल्या मानवी गर्भांच्या पेशी वापरून तयार केलेले एक द्रव्य शीतपेयांमध्ये एक विशिष्ट चव येण्याकरता वापरले जाते.त्या रसायनाचा कोड HEK 293 असतो. वाचून मलाही थोडा धक्का बसला होता.
एका बाटलीत एवढे सगळे ?? पुढील वेळेस शीतपेयाची बाटली मुलांच्या हातात देताना आता नक्की विचार कराल.

आता शीतपेय पिल्यानंतर पुढील ६० मिनिटात ते शरीरात काय आतंक माजवतो ते बघू.

**पहिले १० मिनिटे:शीतपेय पिल्यानंतर एकाच वेळेस जवळजवळ १० ते १३ चमचे साखर शरीरात येते. एवढ्या प्रमाणात एकाच वेळेस घेतलेली साखर खरे तर उलटी होण्यास पुरेशी होते कारण शरीर ते स्वीकारत नाही . परंतु कृत्रिम वास ,चव आणि फॉस्फोरिक ऍसिड मुले हि उलटीची क्रिया रोखली जाते आणि शरीर हे अतिप्रमाणातील साखर पचवायला सुरुवात करते.जे अर्थातच अनैसर्गिक आणि घातक आहे.

**२० मिनिटे; शरीरात आलेली हि अतिप्रमाणात साखर अनैसर्गिक रित्या इन्सुलिन चा स्त्राव वाढवते. यकृत एवढी साखर पचवू न शकल्याने तिचे रूपांतर चरबीत होते .

**४०मिनिटें: शीतपेयामधील कॅफिन चे शरीरात शोषण होते आणि डोळ्यातील बाहुल्यांचा आकार वाढतो.रक्तदाबात थोडी वाढ होते ज्याचा परिणाम म्हणून यकृत रक्तामध्ये अजून शर्करा सोडते.खरेतर एवढ्या प्रमाणातील रक्तातील साखर एखाद्याला भोवळ आणू शकते,परंतु हि जाणीव निर्माण करणाऱ्या मेंदूतील एक रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे हि जाणीव होत नाही उलट अचानक उत्साही वाटायला होते. अगदी बरोबर! छोट्या मात्रेत घेतलेल्या वोडका,व्हिस्की अथवा तत्सम मद्याने जे होते अगदी तसेच बदल शरीरात होतात. आता विचार करा इथे आपण लहान मुलांबद्दल बोलतोय.गंभीर आहे ना?

**४५ मिनिटात शरीरात डोपामाईन नावाचे अंतस्राव स्रवतात ,ज्यामुळे मेंदूला उत्तेजना मिळून क्षणिक आनंदाची लहर निर्माण होते , हो अगदी असेच होते जेंव्हा एखादा ड्रग घेणारा मनुष्य हेरॉईन किंवा तत्सम उत्तेजक ड्रग घेत असतो.इथे कॅफिन हा घटक कृत्रिम रित्या मूड बूस्ट करणारा म्हणून काम करतो यालाच वैद्यकीय भाषेत आम्ही सायको स्टिम्यूलंट (मानस उत्तेजक ) असे म्हणतो.हे अनैसर्गिक होय. अजूनच गंभीर ना?

**६० मिनिटे: शीतपेय प्यायल्यापासून अगदी तासाभरातच त्यातील फॉस्फोरिक ऍसिड आतड्यातील कॅल्शिअम ,झिंक, मॅग्नेशियम हे खनिजे रक्तात नेते त्यामुळे अपचयाची क्रिया वाढते.अति साखर,कृत्रिम गोडव्याचे घटक यामुळे मूत्र प्रवृत्ती वाढून त्यातून कॅल्शियम शरीराबाहेर टाकला जातो.खरेतर हि खनिजे शरीरात हाडे आणि संधी यांच्या वाढीसाठी आतड्यातून शोषले जाणे अपेक्षित असते त्याऐवजी ते शरीरातून बाहेर टाकले जातात.किती मोठी हानी हि शरीराची ती पण केवळ एक पेयासाठी.
आता विचार करा एकदा प्यायल्याने ६० मिनिटात हे होते तर जी लोक वारंवार किंवा खूप जास्त प्रमाणात किंवा हो अगदी रोज पितात त्यांच्या शरीराबद्दल विचार न केलेलाच बरा!

गोड शीतपेयांचे कडू सत्य :

1.शून्य पोषणमूल्ये: शीतपेयांपासून अजिबात पोषण होत नाही उलट आपण पहिले तसे महत्वाचे कॅल्शियम , मॅग्नेशियम,झिंक इत्यादी उपयुक्त खनिजे ते शरीराबाहेर टाकतात.

2.व्यसनी पेय: शीतपेयातील कॅफिन मूळे त्याची खूप सवय होते. थोडक्यात व्यसनच लागते.लहान मुलांचे नाजूक शरीर ह्या कॅफीनच्या विळख्याला लवकर बळी पडते.

3.मुलांमधील वर्तन दोष : शीतपेयांमुळे लहान मुलांमध्ये वर्तन दोष जसे अति आक्रमकपणा, सतत मूड खाली वर होत राहणे, एकाग्रता कमी होणे इत्यादी निर्माण होते असे शास्त्रीय संदर्भ आढळतात. शीतपेयातील कोकेन, कॅफिन आणि अतिसाखर ह्याला कारणीभूत असते.

4.हाडांची ठिसूळता: मूत्राद्वारे शरीरातील कॅल्शियम व इतर खनिजे बाहेर टाकली गेल्यामुळे कॅल्शियम ची कमतरता होते आणि हाडांमध्ये ठिसूळपणा निर्माण होतो. अशी ठिसूळ हाडे लहानशा आघातानेही तुटू शकतात.

सतत शीतपेये पिणाऱ्या मुलांचे दात अतिशय किडलेले असतात हे सांगायची गरज नाही. सोड्यामुळे दातांवरील कवच निघून जाऊन दात ठिसूळ होतात . दातांचे अनारोग्य पुढे जाऊन विविध पचनाच्या विकारांना आमंत्रण देते.

5.स्थौल्य , डायबेटीस आणि हृदय विकार:शीतपेय हे लहानमुलांमधील वाढलेले अति स्थौल्य, डायबेटीस आणि विविध हृदयाच्या विकारांचे एक प्रामुलख कारण आहे.अति स्थौल्य हे बाकीच्या अनेक विकारांना आमंत्रण देते. हा खूप जास्त काळजीचा विषय आहे.तोच गांभीर्याने घेतला जात नाही हि किती खेदाची गोष्ट आहे.एक पूर्ण पिढी ह्या विळख्यात अडकली आहे हे चित्र आहे समाजातील.

मला वाटते हि कारणे पुरेशी आहेत का आपल्या मुलांना ह्या शीतपेयांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी?
पालकांनो ,
**आपल्या मुलांमध्ये अगदी लहानपणापासूनच चांगल्या सवयी वाढीस लावा,मुलं मोठी झाली कि शीतपेयांच्या आहारी गेलेली असल्यामुळे ते सोडण्यास खूप अवघड जाते.

**शीतपेयांऐवजी नारळ पाणी, कोकम सरबत, जलजिरा , फळांचे रस हे पर्याय निवडा आणि ते मुलांना नीट समजावून देखील सांगा.

**खाद्यपदार्थांबरोबर पिण्यासाठी पाण्यासाखी उत्तम गोष्ट दुसरी असूच शकत नाही.खाताना तसेही सोडा, शीतपेय, फळांचे रस इत्यादी घेणे बरोबर नसतेच. त्यातील आंबट गोड रसांचा पचनावर विपरीत परिणाम होतो. म्हणून खाताना पेय टाळा पाणीच प्या.

**पालक हे मुलांसाठी उत्तम आदर्श असतात त्यामुळे आधी तुम्ही स्वतःच्या सवयी तपासा आणि शक्यतो मुलांसमोर का होईना असे करणे टाळा .

**मुलं हे गोड आणि तरबेज ब्लॅकमेलर असतात कृपया त्यांच्या हट्टाना आणि आर्जवांना बळी पडू नका. विशेषतः आजी आजोबाना आणि पाहुणे मंडळींना हि सूचना कायम करावी लागते.

शीतपेय , त्यातील अर्थकारण आणि राजकारण आणि त्याला बळी पडणारे मुलांचे आणि मोठ्यांचे आरोग्य, त्यामागील राजकारण आणि फार्मा इंडस्ट्री यासारखे मुद्दे मी या लेखात मांडले नाहीए. कारण माझ्या लेखाचा उद्देश माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींना जर ह्या गोष्टी पूर्वी माहित नसतील तर त्याबाबत त्यांना ते ज्ञान मिळावे इतका साधा आणि प्रांजळ आहे.

वैद्य म्हणून मला राजकारणात नव्हे तर माझ्या पेशंट आणि समाजातील लोकांच्या स्वास्थ्यात जास्त रस आहे, काळजी आहे.

दुर्दैवाने आपल्याला वाटते मोठ्या शहरात आणि पैश्याने बरे असलेल्यांमध्येच हे प्रमाण जास्त आहे.खूप खेदाने लिहितेय आज लहान लहान खेड्यांमध्ये आणि का नागरिकांमध्ये शीतपेयांचा खप जास्त होतो. शहरात उलट मोठमोठ्या शीतपेयांच्या कंपन्यांना तोटा सहन करावा लागतोय त्यामुळे ते आपला जम लहान लहान खेड्यांमध्ये बसवताय.त्यासाठी मीडिया आणि जाहिराती, प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार हा खप वाढवण्यासाठी जाहिराती करताय. असे करून हे हिरो हिरोईन आपल्याच चाहत्यांचे, निरागस फॅन लोकांचे आणि मुलांचे आरोग्य धोक्यात घालताय हि केवढी मोठी फसवणूक!

असो मुख्य मुद्दा लेखातून आपल्यापर्यंत पोचला असेलच आपल्या शंका प्रतिक्रिया नक्की कळवा.हि माहिती शेअर करून इतर व्यक्तींनाही सजग करा.

लेखिकेचे इतर लेख आपण पुढील लिंक वर वाचू शकाल
drrupalipanse.wordpress.com

वरील लेख लेखिका वैद्य रुपाली जोशी पानसे यांचा होय.
लेखातील लिखाणात बदल करणे अथवा लेखिकेचे नाव बदलणे अथवा लेखाची तत्सम छेडछाड हा लिखाणासंदर्भातील कायद्याचे उल्लंघन व गुन्हा म्हणून ग्राह्य होय .
वैद्य रुपाली पानसे ,
आद्यं आयुर्वेद, पुणे ,
rupali.panse@gmail.com
9623448798.
(लेख आवडल्यास मूळ लेखात फेरफार न करता तसेच लेखिकेच्या नाव व इतर माहितीसह पोस्ट अथवा शेअर करावा. आपल्या या कृतीने काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागेल)

Beauty,Media & Ayurveda!

सौंदर्य ,मीडिया आणि बळजबरीचा आयुर्वेद!
आज सगळ्यात जास्त एनकॅश जो विषय होतो ते सौंदर्य, जनमानसावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारे माध्यम मीडिया आणि ज्याच्या नुसत्या नावाने काहीही खपू शकते असा बिचारा आयुर्वेद हे तीन वर वर काहीच संबंध नसणारे टोकाचे विषय आज जाणून बुजून ,ठरवून एकत्र आणले गेले आहेत. मिलियन डॉलर मार्केट आणि कोर्पोरेट स्ट्रॅटेजी ची माया!
कमीत कमी शब्दात हा विषय पोचवण्याचा प्रयत्न करतेय,लिहत गेले तर पुस्तक सहज होईल यावर!
सौंदर्य म्हणजे काय ? गोरी त्वचा (मुलींची आणि हल्ली मुलांची देखील) हि सर्रास व्याख्या आज सौंदर्याची झालीये, नव्हे ती जाणूनबुजून करण्यात आलीये आणि आज आपल्याला पटायला देखील लागलीये.आज नव्हे तर पिढ्यानपिढ्या समाजमत असे होत गेलेय. समाजातील याच चुकीच्या रुजलेल्या रुढीची परिणती सौंदर्य निर्मिती क्षेत्रातील अफाट वाढीत होतेय नव्हे झालीये. माणसाला वाटणारे ‘शॉर्ट कट’ चे आकर्षण हा एक शापच म्हणायला हवा.काही आठवडे क्रीम लावा नि गोरे व्हा ,आयुष्य इतके सोपे असते का?परंतु मिनिटं मिनिटाला लागणाऱ्या TV वरील जाहिराती, पानं च्या पानं भरून गोरीपान कांती दाखवणारी गोरेपणाच्या क्रीम ची मॉडेल यासारख्या गोष्टींचा इतका भडीमार सतत होतो कि ते पटायला लागते, खरे वाटायला लागते.कारण जाहिरात करणारे कुठेतरी आपलेच आदर्श असतात,हिरो आणि हिरोईन! सौंदर्यवर्धक उत्पादकांचा टार्गेट ऑडियन्स सहज या फसव्या जगाला बळी पडतो.
खरे सौंदर्य काय? मुलींमध्ये वयानुसार सहज होणारी शारीरिक मानसिक वाढ, स्त्रीसुलभ भाव व जबाबदारी, निकोप शरीर आणि मन ,आत्मविश्वास आणि सर्वात महत्वाचे स्वतःला स्वतःच्या गुण दोषांसकट स्वीकारून स्वतःमध्ये एक माणूस म्हणून बदल घडवणे, हे खरे सौंदर्य होय. तसेच मुलांमध्ये व्यायाम करून कमावलेले उत्तम शरीर, वाढत्या वयानुसार एक व्यक्ती म्हणून असलेले समाजभान, जबाबदारी,साहसी खेळ,समाजाला उपद्रव नाही तर अभिमान वाटेल असे वागणे म्हणजे खरे सौंदर्य होय.क्रीम फासून गोरे होण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न म्हणजे तारुण्याचा अपमान च होय.
या सगळ्यात मीडिया चा काय रोल?

 मीडिया मध्ये प्रिंट मीडिया(म्हणजे वृत्तपत्र,मासिक,साहित्य इत्यादी),audiovisual मीडिया ज्यात TV ,चित्रपट इत्यादी येतात या गोष्टींचा youth ,तरुण वर्गावर सर्वात जास्त प्रभाव असतो. एखाद्या समाजाचे मत तयार करणे ,थोडक्यात समाजावर संस्कार करण्याचे काम मीडिया करत असतो. त्यामुळेच मीडिया चा ह्या सर्वात खूप महत्वाचा रोल आहे.
स्त्रीवर्गाची स्वतःबद्दलची मानसिकता आणि पुरुषांची स्त्रियांबद्दलची मानसिकता घडवण्याचे दुर्दैवाने बिघडवण्याकडेच आज मीडियाचा  कल दिसतोय.गोरा रंग या एकाच निकषावर स्त्रीचे सौंदर्य मोजून तिचे स्वत्व,कर्तृत्व,गुण,शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता या सगळ्या गोष्टी फुटकळ ठरवण्याचे काम आज मीडिया करताना दिसते.तुमचा रंग सावळा, निमगोरा ,गव्हाळ किंवा काळा असूच शकत नाही का?. क्रीम लावून गोरे झाला नाहीत तर नोकरी मिळणार नाही, नवरा मुलगा नकार देणार, गर्लफ्रेंड दुसऱ्याबरोबर गाडीवर निघून जाणार इतक्या खालच्या दर्जाच्या जाहिराती आज आपण रोज शांतपणे बघतोय. कारण आपण या गोष्टीचा स्वीकार केलाय.किशोरवयीन बदलांना सामोरे जाणारी तरुण पिढी,भविष्यकाळाची अनिश्चितता,सारासार विचार करण्याइतपत न आलेली maturityविरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दलचे वाटणारे आकर्षण, व्यसनाधीनता याबरोबरच गोरेपणा चा दबाव यामुळे सहज या विचारांना बळी पडते.
एखाद्या अतिशय संवेदनशील चित्रपटातील आवश्यक आणि अतिसंवेदनशील सीन सेन्सॉरच्या नावाखाली कापला जातो आणि या अतिसुमार दर्जाच्या जाहिराती ज्या आज समाजातील स्त्रीचे इतके बीभत्स चित्रण, प्रतिमा तयार करताय ते आपण रोज कुटुंबासोबत बसून बघतोय. का ?कॉर्पोरेट स्ट्रॅटजी आणि मिलियन डॉलर मार्केट! या जायंट इंडस्ट्रीचा मीडियावरील आर्थिक होल्ड इतका आहे कि समाजाच्या मनाचे,सारासार बुद्धीचे,नैतिकतेचे स्वास्थ्य जपणे ,वाढवणे हा उद्देष असलेले वृत्तपत्र, दूरचित्रवाणी, चित्रपट,साहित्य आज कस्टमर base  तयार करताय. समाजप्रबोधन हे मीडिया चे ध्येय मीडिया साफ विसरत चाललीये.मीडिया ने रुजवेलेले सौंदर्याचे निकष आणि स्त्रीची चुकीची इमेज हि आज तरुण पुरुष वर्गाची स्त्रीबद्दलची अतिशय भयानक आणि चुकीची मानसिकता, त्यातून होणारे  परिणाम, गुन्हे इतपत गंभीर आहे, याचा आपण कधी विचार करतो का? एक गोरेपणाची जाहिरात वेगवगेळ्या समाजातील घटकांवर किती विपरीत परिणाम करू शकते. सावळा, काळा रंग असलेल्या मुलींना  स्वतःला स्वीकारून ह्या सगळ्या चुकीच्या रूढ प्रवाहाविरुद्ध जायला किती त्रास होत असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. तर सौंदर्य क्षेत्र आणि मीडिया यांचा हा असा संबंध आहे.
आता या सगळ्यात आयुर्वेद कसा आला ?
सर्वप्रथम काही गोष्टी स्पष्ट करूयात. आयुर्वेदात गोरा रंग इत्यादी ला अजिबात महत्व दिले नाही. गोरा रंग होण्याचे नुसखे हे आयुर्वेद नाही सांगत. ते आयुर्वेदाच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणारे सांगत असावेत.आयुर्वेदात वर्ण म्हणजे रंग याचा उल्लेख प्राकृत म्हणजे नॉर्मल आणि अप्राकृत म्हणजे ऍबनॉर्मल असा आलाय. त्वचेच्या आरोग्याचे आणि काळ्या गोऱ्या व इतर रंगाचे वर्णन प्रकृती, वेगवेगळ्या धांतूंची सारता किंवा एखाद्या व्याधीत मनुष्याच्या रंग कसा फिकट, पांढरा, पिवळा इत्यादी होतो असे काही उल्लेख आहेत.आणि त्या अनुषंगाने काय उपाय करावे म्हणजे मनुष्याचा पूर्वीचा रंग व्याधी जाऊन परत येईल असे होय. त्वचेचे विकार आणि आरोग्य हा विषय आयुर्वेद उत्तमपणे निश्चित हाताळतो परंतु त्वचेला गोरे करणे असा कुठेही उल्लेख नाही. त्वचेच्या आरोग्याकरिता आहार, विहार आणि औषधी अशी योजना वर्णन केली आहे. सहा आठवड्यांचे fairness क्रीम हि आयुर्वेदाची नीती नव्हे .
परंतु सौदर्य वर्धक उत्पादनांमध्ये वापरलेल्या रसायनांचे जसजसे गंभीर side effects दिसायला लागले तसतसे अपायरहित आयुर्वेदाची मदत किंबहुना कुबडी या कंपन्याना घ्यावी लागली. आणि मग सुरु झाला हर्बल क्रीम चा प्रवास.आधी काय कुंकुमादी तेल युक्त, मग काय केसर,आता काय मोती युक्त ,मग काय सोने युक्त आणि तो वाढतोय आणि आपण खऱ्या अर्थाने व्हिक्टिम बनतोय.हर्बल बिरबल हा माझा हर्बल उत्पादनांवर प्रकाश टाकणारा लेख मी मागेच सविस्तर लिहलाय तेंव्हा इथे विस्तृत लिहीत नाही.वर्डप्रेस वर अवश्य वाचा.
तर गोरा रंग म्हणजे सौंदर्य अशी ठरवून केली गेलेली चुकीची व्याख्या ,मीडियाला हाताशी धरून तिला अजून खतपाणी आणि त्यामुळे स्त्रीवर्गाचे झालेले कायमचे न भरून येणारे नुकसान आणि या सगळ्यात सोयीस्कर वापरलेले गेलेले आयुर्वेद शास्त्र हे सगळं फक्त आणि फक्त व्यवसाय आणि त्याच्याशी संबंधित खेळींचा भाग आहे.
माझा वाचकवर्ग सौंदर्याची अशी चुकीची व्याख्या यापुढे कधीच स्वीकारणार आणि अशी मला खात्री आहे. हा लेख समाजात एक लहानसा का होईना पण चांगला बदल घडवेल अशी प्रामाणिक इच्छा!